मुंबई महानगरपालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज


मुंबई : कोरोनाचे बदलत असलेले रुप, त्याचबरोबर समोर येऊ लागलेले डेल्टा व्हेरियंटसारखे नवीन प्रकार आणि त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मे आणि जून महिन्यात 6 ते 18 वयोगटांतील लहान मुलांचा मुंबईतील 24 वॉर्डमध्ये सर्व्हे केला होता.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर सेरो सर्व्हेचा हा निकाल आशादायक मानला जात आहे. या सर्व्हेसाठी एकूण दहा हजार मुलांचे नमुने घेण्यात आले होते, अशी माहिती आहे. एप्रिलमध्ये झालेल्या एका सर्व्हेमध्ये मुंबईतील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा निष्कर्ष तिसऱ्या सेरो सर्व्हेतून समोर आला होता. तर दुसरीकडे झोपडपट्टी रहिवाशांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे समोर आले होते. यासाठी 24 विभागांमध्ये दहा हजारांहून अधिक लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता.