भारतातील देशव्यापी लसीकरण अभियानाने पार केला 32.36 कोटींचा टप्पा; अमेरिकेलाही टाकले मागे


नवी दिल्ली : संपूर्ण जग ज्या महामारीच्या विरोधात लढाई लढत आहे, त्यावर प्रतिबंधक लस हे एकमेव अस्त्र आहे. याची जाणीव संपूर्ण जगाला आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण डिसेंबरच्या आधी पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे. भारताने कोरोना लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. 16 जानेवारी 2021 रोजी भारतात कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात तर 14 डिसेंबर 2020 रोजी अमेरिकेत लसीकरण अभियानाला सुरुवात झाली.

भारताने देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 43,21,898 सत्रांमध्ये, एकूण 32,36,63,297 लसी देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 17,21,268 लसी देण्यात आल्या. 21 जून 2021रोजी कोरोना लसीकरणाच्या नव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

जगभरात कोणत्या देशात किती झाले

  • इंग्लंड – 7 कोटी 67 लाख 74 हजार 990 ( सुरुवात – 8 डिसेंबर 2020 )
  • अमेरिका – 32 कोटी 33 लाख 27 हजार 328 ( सुरुवात – 14 डिसेंबर 2020 )
  • इटली – 4 कोटी 96 लाख 50 हजार 721 ( सुरुवात – 27 डिसेंबर 2020 )
  • जर्मनी – 7 कोटी 14 लाख 37 हजार 514 ( सुरुवात – 27 डिसेंबर 2020 )
  • फ्रान्स – 5 कोटी 24 लाख 57 हजार 288 ( सुरुवात – 27 डिसेंबर 2020 )
  • भारत – 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 ( सुरुवात – 16 जानेवारी 2021)