दिलासादायक! कोरोनामुळे होत असलेल्या मृतांच्या संख्येत मोठी घट


नवी दिल्ली – देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली आहे. देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीप्रमाणे काल दिवसभरात देशात ४६ हजार नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात आणखी एक मोठी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे होत असल्येल्या मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाटे शिगेवर पोहोचल्यानंतर दररोज साडेतीन हजार ते साडेचार हजार या सरासरीने मृतांची नोंद झाली होती. मृतांचा आकडा वाढण्यास एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरूवात झाली होती. तीन महिन्यांनंतर मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकतीच देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. काल दिवसभरात देशात ४६ हजार १४८ नवी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ५८ हजार ५७८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात कोरोनाचे ९,९७४ नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात १४३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात रायगड ६७२, पुणे जिल्हा ५८७, पुणे शहर २८६, पिंपरी-चिंचवड ३८६, सातारा ९२९, कोल्हापूर १५२५, सांगली १२०५, सिंधुदुर्ग ५०८, रत्नागिरी ५८३ नवे रुग्ण आढळले. विदर्भ आणि मराठवाडय़ातील रुग्णसंख्येत घट झाली आहे.

मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहे. रविवारी ७४६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १३ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी ३२ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. बाधितांचे प्रमाण मात्र २.२८ टक्के होते. मुंबईत एकूण बाधितांची संख्या सात लाख २० हजारांपुढे गेली आहे. तर मृतांची एकू ण संख्या १५ हजार ३९६ झाली आहे. एका दिवसात १२९५ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सहा लाख ९४ हजारांहून अधिक म्हणजेच ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या ८,५८२ झाली आहे.