नागरिकांना डेल्टा प्लसबाबत घाबरण्याची अजिबात गरज नाही; CSIRचे प्रमुखांचे मत


मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकाराला घेऊन संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा सुरु असल्यामुळे लोकांमध्ये सध्याच्या घडीला भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या घडीला राज्यात फक्त 20 रुग्ण या डेल्टा प्लसच्या प्रकाराने बाधित आहे. या कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या अनुषंगाने सध्या देश पातळीवर जोरदार संशोधन सुरु आहे, पण संशोधनात कुठेच डेल्टा प्लस या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे कुठलेच पुरावे मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी या कोरोनाच्या नवीन प्रकाराला घेऊन घाबरण्याची अजिबात गरज नाही.

त्याचबरोबर महामारीच्या काळात अशा अनेक संसर्गच्या लाटा येत असतात. पण तिसरी लाट केव्हा येईल ते आताच सांगता येत नाही, त्या लाटेची तीव्रता कमी ठेवायची जबाबदारी ही नागरिकांच्या हातात असल्याचे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले आहे. डॉ. शेखर मांडे यांनी हे मत एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डेल्टा प्लसने या सर्व प्रकारात चिंतेत भर टाकली आहे. सध्या जगात सर्वात जास्त चिंता डेल्टाबाबत व्यक्त केली जात आहे. त्याच्याच परावर्तित प्रकाराचे म्हणजे डेल्टा प्लसचे 21 रुग्ण राज्यात आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव, येथे असून काही रुग्ण मुंबई, ठाणे, रायगड परिसरात आहे.

डॉ मांडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, डेल्टा प्लसच्या या प्रकाराला घेऊन जी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याबद्दल खूप गैरसमज निर्माण केले जात आहे. या विषाणूच्या प्रकाराला घेऊन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने संशोधन केले आहे. त्यामध्ये असे कुठलेही पुरावे आढळले नाही कि हा विषाणू घातक आहे किंवा त्याचा संसर्गाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही. दुसरे म्हणजे डेल्टा हा विषाणू सध्या देशभरात आहे. तिसरी लाट केव्हा येईल माहीत नाही, पण त्याची तीव्रता कमी करण्याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांची आहे. कोरोनाच्या अनुषंगाने जर सुरक्षित वावर ठेवला आणि लसीकरण करून घेतले तर तिसरी लाट गंभीर असण्याची शक्यता फार कमी आहे.

डेल्टा प्लसची लक्षणे ही सर्वसाधारण कोरोनाची लक्षणे असतात. या विषाणूचा प्रादुर्भाव किती गंभीर आहे, याबाबत अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे. या विषाणूचा फैलाव किती राहील हे आताच सांगणे मुश्किल आहे. ह्या नवीन विषाणूचे वर्तन कसे असेल, याबाबत आता कुणीच काही सांगू शकत नाही. विषाणूचे परावर्तित होणे म्हणजे नेमके काय होते हे जाणून घेणे गरजेचे आहे.

वैद्यकीय तज्ञांचे मते, यापूर्वीच्या साथीच्या आजारात हे दिसून आले आहे कि, प्रत्येक विषाणू हा आपले अस्तित्व टिकवून ठेवत असतो. याकरिता तो स्वतःच्या रूपामध्ये बदल करून घेत असतो. कोरोनाच्या या काळातच ब्राझील स्ट्रेन, युके स्ट्रेन , दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन बघितले आहे. भविष्यात असे आणखी विषाणूचे प्रकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विषाणूचे बदल होत जाणे ही एक प्रक्रिया आहे आणि याचे ज्ञान वैद्यकीय जगताला अवगत आहे.