भाजप नेत्याची मोठी मागणी; कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना द्यावे दहा लाख रुपये


लखनौ – संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे अक्षरशः थैमान घातले. कोरोनाची दुसरी लाट शिगेला असतानाच देशात दिवसाला चार ते साडेचार हजार मृत्यूची नोंद झाली. याच काळात उत्तर प्रदेशात गंगेच्या पात्रात मृतदेह वाहून आल्यामुळे खळबळ उडाली होती.

भाजपच्या मंत्र्यांसह नेत्यांनीही उत्तर प्रदेशात निर्माण झालेल्या परिस्थिती योगी सरकारवर टीका केली होती. भाजप नेत्याने दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीवरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. पहिल्या लाटेतून सरकारने काहीच धडा घेतला नसल्याचे सुनावत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लाख नुकसान भरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी भाजप नेते राम इक्बाल सिंह यांनी केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील अभूतपूर्व परिस्थितीवरून योगी आदित्यनाथ सरकारला भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या राम इक्बाल सिंह यांनी सुनावले आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल बलियामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून आरोग्य विभागाने काहीच धडा घेतला नाही. ज्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे प्रचंड मृत्यू झाल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

सिंह कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल बोलताना म्हणाले, दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे प्रत्येक गावात कमीत कमी दहा लोकांचा मृत्यू झाला. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष लोटली, तरी ३४ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात डॉक्टर आणि औषधीही उपलब्ध होत नाही. कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बलिया जिल्ह्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दौरा केला होता. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत समाधान व्यक्त केले होते. राम इक्बाल सिंह यांच्या निदर्शनास हा मुद्दा आणून देण्यात आला. त्यावर बोलताना सिंह म्हणाले, मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली. त्यांना सत्य परिस्थिती दाखवली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकारने शेतकऱ्यांना डिझेलवर अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.