२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आणि मरणोपरांत अशोकचक्र पदकाने गौरविले गेलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान केला गेला आहे. महाराष्ट्रात संशोधकांना सापडलेल्या नव्या कोळी प्रजातीला ‘आयसीयस तुकारामी’ असे नाव दिले गेले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात ओंबळे यांनी जीवाची बाजी लावून मोठे योगदान दिले होते.

संशोधकांच्या एका टीमने प्रसिद्ध केलेल्या एका पेपरमध्ये याचा पहिला उल्लेख केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात कोळी किटकाच्या दोन नव्या प्रजाती मिळाल्या आहेत. त्यातील एकाला जेनेर फिन्टेला तर दुसऱ्या प्रजातीला आयसीयस तुकारामी असे नाव दिले गेले आहे.

मुंबईवरच्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी सीएसटी रेल्वे स्टेशनवर हल्ला करून नंतर कामा हॉस्पिटलला टार्गेट केले होते. तेथे तैनात पोलिसांवर हल्ला चढवून ६ पोलिसांना ठार केले होते. त्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले होते. कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान याना गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी अडविले तेव्हा कसाबच्या हातातील रायफलची नळी पकडून ओंबळे यांनी त्याला अडकविले आणि अन्य पोलिसांना कसाबला जिवंत पकडता आले होते. यात ओंबळे यांच्या शरीरात २७ गोळ्या लागल्याने ते शहीद झाले होते.