भारतीय सैनिक ठाण्यावर जम्मू मध्ये पहिला ड्रोन हल्ला

जम्मू विमानतळ परिसरात रविवारी पहाटे २ च्या सुमारास दोन स्फोट झाले आणि यातील स्फोटके टाकण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर केला गेला असल्याचे समजते. यात वायुसेनेच्या तांत्रिक विभागाच्या इमारतीच्या छताचे थोडे नुकसान झाले तर दुसऱ्या स्फोटामुळे दोन कर्मचारी मामुली जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन संशयिताना अटक केली गेली आहे. या सैनिकी तळाची जबाबदारी आणि देखभाल वायुसेनेकडे आहे.

या घटनेमुळे जम्मूची सुरक्षा वाढविली गेली आहे. जम्मू काश्मीरचे डीआयजी दिलबागसिंग यांनी ड्रोन मधून स्फोटके टाकली गेल्याचे सांगून हा दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. हवाई मार्गाने हा विमानतळ आणि मकबाल सीमा यात ५ किमीचे अंतर आहे. गेले काही दिवस पाकिस्तान सीमा भागात सातत्याने ड्रोनच्या सहाय्याने रेकी करत असल्याचे प्रकार यापूर्वीच उघडकीला आले आहेत. त्यामुळे हा हल्ला पाकिस्तानमधून झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

घटनास्थळी एनआयए, एनएसही कमांडो पोहोचले असून जम्मू हवाई दल बेस, अवंतीपूर, उधमपूरसह अनेक बेसवरील सुरक्षा वाढविली गेली आहे. जम्मू मध्ये हाय अॅलर्ट घोषित केला गेला आहे.