शरीरातील कोलेस्टेरोल वाढल्याची असू शकतात ही लक्षणे

cholesterol
शरीरामध्ये कोलेस्टेरोल वाढले असले, तर त्याचे विपरीत परिणाम निरनिराळ्या तक्रारींच्या स्वरूपामध्ये दिसून येऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने हृदयाशी निगडित तक्रारींचा समावेश आहे. रक्तामध्ये आढळणारे कोलेस्टेरोल किंवा ‘लिपीड’ नामक स्निग्ध पदार्थ शरीराच्या सामान्य गतिविधींसाठी आवश्यक असतो. हे कोलेस्टेरोल चांगले (गुड) आणि वाईट (बॅड) असे दोनही प्रकारचे असते. चांगले कोलेस्टेरोल शरीरासाठी आवश्यक असले, तरी याचे अतिरिक्त प्रमाण मात्र अपायकारक ठरू शकते. जर कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढत गेले, तर ते अनेक तऱ्हेच्या व्याधींना आमंत्रण ठरू शकते. याचा थेट दुष्परिणाम हृदयावरही दिसून येतो. शरीरामध्ये कोलेस्टेरोलच्या वाढत्या प्रमाणाची काही ठराविक लक्षणे वैद्यक शास्त्रामध्ये सांगितली गेली आहेत. ही लक्षणे वारंवार आढळून येऊ लागल्यास योग्य तपासणी केऊन घेऊन तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
cholesterol1
अनेक व्यक्तींना अगदी थोडे श्रम घेतल्याने ( उदाहरणार्थ अगदी काहीच पायऱ्या चढून गेल्याने, किंवा थोडे जलद चालल्याने ) देखील धाप लागून सामान्यपणे श्वासोच्छ्वास करणे कठीण होते. हे लक्षण कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढल्याचे असू शकते. त्याचबरोबर अनेकांना अकारण पायदुखी सतावू लागते. जास्त वेळ उभे न राहता, किंवा जास्त न चालता / पळता, जास्त श्रम न घेता देखील पाय वारंवार दुखू लागतात. हे देखील कोलेस्टेरोल वाढल्याचे लक्षण असू शकते.
cholesterol2
उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान जास्त असल्याने आणि हवेमध्ये उष्मा किंवा आर्द्रता जास्त असल्याने घाम येणे सामान्य बाब आहे. मात्र मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात घाम येणे, अगदी थोड्या हालचालीने देखील घामाघूम होणे, हे कोलेस्टेरोलचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षण असू शकते. त्याचबरोबर अचानक वजन वाढू लागणे, हृदयाच्या ठोक्यांची गती जलद होणे, रक्तदाब वाढणे, किंवा छातीमध्ये वारंवार वेदना उठणे ही देखील धोक्याची सूचना असू शकते. ही आणि अश्या प्रकारची कोणतीही लक्षणे वारंवार आढळू लागल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment