या ठिकाणी तुम्हाला हिरे सापडलेच, तर ते तुमच्या मालकीचे!

diamond
या प्रकरणाची सुरुवात झाली १९०६ साली, जॉन हडलस्टन नामक एक शेतकऱ्यापासून. जॉन त्याच्या शेतामध्ये काम करीत असताना त्याला दोन दगड सापडले. हे दगड सामान्य दगडांच्या मानाने खूप वेगळे भासत असून, ते पिवळसर रंगाचे आणि अतिशय चमकदार होते. अश्या प्रकारचे दगड जॉनने त्या पूर्वी कधीही पाहिले नव्हते. जॉन कडे एक मोठा दगडी पाटा होता. या पाट्यावर हिरा सोडून अन्य कोणतीही वस्तू घासून त्याला आकार देता येईल असा हा पाटा होता. जॉनने त्याला सापडलेले दगड या पाट्यावर घासले खरे, पण त्या दगडांमुळे पाट्यावर चरे पडले. तेव्हा आपल्या हातामध्ये आहेत ते दगड सामान्य नाहीत हे जॉनच्या लक्षात आले. जॉनने हे दगड शहरातील जव्हेऱ्याकडे नेले असता, हे दगड अतिशय मौलायावान हिरे असल्याचे जव्हेऱ्याने त्याला सांगितले. पाहता पाहता जॉनला त्याच्या शेतामध्ये हिरे सापडल्याची घटना सगळीकडे पसरली.
diamond1
त्यानंतर जॉनचे शेत असणारा मर्फिसबोरो, अर्कान्सासचा हा भाग ‘द डायमंड फार्म’ म्हणून प्रसिद्ध झाला. आजच्या काळामध्ये हा परिसर सामान्य जनतेसाठी देखील खुला असून, जर या ठिकाणी हिरे सापडलेच, तर ते सोबत घेऊन जाण्याची मुभा लोकांना आहे. त्यामुळे आपले नशीब आजमाविण्यासाठी अनेक लोक येथे आवर्जून येत असतात.
diamond2
भूगर्भामध्ये सातत्याने बदल होत असतात. भूगर्भातील विविध थरांच्या मध्ये दबल्याने आणि भूगार्भामध्ये तापमान जास्त असल्याने कार्बनचे रूपांतर हिऱ्यामध्ये होत असते. त्यानंतर भूगर्भातील वायूंच्या दबावामुळे उद्रेक होऊन भूगर्भाच्या आतील खडक जमिनीतून वर येत असतात. असेच काहीसे डायमंड फार्म मध्ये घडले असावे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. अनेक दशकांपूर्वी येथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे येथे एक प्रचंड मोठे विवर तयार झाले. भूगर्भातून बाहेर फेकले गेलेले खडक जास्त दूर जाऊन न पडता या विवरातच राहिले. १९०६ साली जॉन हडलस्टनला हे लहान-मोठे खडक किंवा दगड म्हणजे हिरे आहेत हे समजेपर्यंत या विवरामध्ये हिऱ्यांचा खजिना दडलेला असल्याची गंधवार्ताही कोणाला नव्हती.
diamond3
जॉनने हिरे शोधून काढल्यानंतर या घटनेला भरपूर प्रसिद्धी मिळाली. जॉनला ज्या शेतामध्ये हिरे सापडले ते शेत त्याने एक हजार डॉलर्स आणि एका खेचराच्या बदल्यात खरेदी केले होते. पण हिरे सापडल्यानंतर हेच शेत जॉनने ३६,००० डॉलर्सला, एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याला विकले. आजवर या ठिकाणी सुमारे ४७१ आणखी हिरे सापडले असून, आजवर सापडलेल्या सर्व हिऱ्यांमध्ये सर्वात मोठा हिरा ४०.२३ कॅरटचा आहे. हा बहुमूल्य हिरा हिलरी क्लिंटन यांच्या मालकीचा आहे.

Leave a Comment