फोटोग्राफरने उभारली उंदरांसाठी कॉलनी


आपल्या घरात एक उंदीर शिरला तरी त्याला बाहेर काढण्यासाठी नाना उपाय त्वरित केले जातात. औषध घालून मारणे, पिंजरे सापळे लावणे, मांजर पाळणे असे अनेक उपाय योजले जातात. प्रसिद्ध वाइल्डलाईफ फोटोग्राफर सायमन डेल याने मात्र वेगळाच उपाय योजला असून त्याने या उंदरांसाठी घराच्या बागेत चक्क एक कॉलनी उभारली आहे. सुरवातीला एका उंदरासाठी त्याने चिमुकले घर उभारले पण आता या कॉलनीत उंदरांचे नऊ परिवार गुण्यागोविंदाने नांदत आहेत. सायमन त्यांच्यासाठी स्थानिक फळे, मका, शेंगदाणे अशी रसद पुरवितो.


सायमन सांगतो, घराच्या बागेत तो एकदा काही उकराउकरी करत असताना त्याची नजर एका जंगली उंदरावर पडली. या उंदरावर एका मांजराची नजर होती तेव्हा या उंदराला मांजर मारणार म्हणून सायमनने त्याच्या रक्षणासाठी मातीत एक बॉक्स बसविला आणि भोवती काटेरी तारा लावल्या.


या उंदराला त्याने जॉर्ज असे नाव दिले आणि जॉर्ज त्याच्यासाठी उभारलेल्या या घरात आनंदाने गेला. काही दिवसांनी सायमनला जॉर्जची जोडीदारीण आल्याचे दिसले आणि काही काळात पिलेही. परिवार वाढतोय हे पाहिल्यावर सायमनने याच घराला लागून आणखी काही खोल्या लाकडाचे ओंडके पोखरून बनविल्या. या सर्व खोल्या आतून एकमेकांना जोडलेल्या होत्या.


उंदीर आणखी वाढले तसे सायमनने ही कॉलनी वाढविली आणि मांजरापासून त्यांना संरक्षण मिळावे म्हणून भोवती तारेचे कुंपण घातले. हळूहळू सायमनने या घरांसमोर कपडे वळविण्याच्या छोट्या दोऱ्या, खेळण्यातल्या गाड्या, छोटी डायनिंग टेबले, खुर्च्या, झोपाळे, पोस्टबॉक्स लावून कॉलनीची सजावट केली. सायमन सांगतो मी येथे फळे, शेंगदाणे, मका ठेवतो त्यावर ताव मारून उंदरांच्या चेहऱ्यावर जी तृप्ती दिसते ती फोटो मध्ये बंदिस्त करतो.


सायमन म्हणतो, हे उंदीर अजूनही जंगलीच आहेत. मी जरा जवळ गेलो कि ते पळून जातात. मग मी माझ्या कॅमेऱ्याच्या झूम लेन्स मधून त्यांच्या घरात डोकावतो, त्यांच्या हालचाली निरखतो आणि त्या कॅमेऱ्यात त्या टिपतो. यातून मलाही समाधान मिळते.

Leave a Comment