तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या मौलवीच्या गुप्तांगावरच पत्नीने केला वार


मुझफ्फरनगर – तिसऱ्या लग्न करण्याच्या प्रयत्नात असताना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात ७७ वर्षीय मौलवीला जीव गमावावा लागला. लग्नाचा आग्रह धरल्यावर पहिल्या पत्नीने मौलवीच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हे कृत्य आधीच्या दोन पत्नींपैकी एका पत्नीने केले आहे.

या संदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुजफ्फरनगरमधील भौरकला पोलीस स्टेशन परिसरातील शिकारपूर गावात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. तिसरे लग्न न करण्याच्या मागणीकडे मौलवी वकील अहमदने दुर्लक्ष केल्यानंतर पहिली पत्नी हाजराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मौलवीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

आरोपी महिलेने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने मौलवीचे अंतिम संस्कार करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्यांना याबद्दल संशयास्पद वाटले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी विचारपूस केली असता महिलेने गुन्ह्याची कबुली दिली.

याबाबत माहिती देताना भौरकला पोलीस स्टेशनचे प्रमुख यांनी सांगितले आहे की, बुधवारी (२३ जून) संशयास्पद परिस्थितीत एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. कुटुंबातील लोक त्याला पुरण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

त्यावेळी त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी आणि गुप्तांगावरदेखील गंभीर जखमा झाल्याची माहिती समोर आली. मृत व्यक्ती हा भौरा खुर्द गावातील मशिदीत मौलवी होता. त्यानंतर पोलिसांनी मौलवीची पत्नी हाजराकडे चौकशी केल्यानंतर हत्येची माहिती समोर आली.

पोलिसांना हाजराने सांगितले की, यापूर्वीच मृत मौलवी वकील अहमदने दोन विवाह केले होते. हाजरा ही पहिली पत्नी होती. त्यांना ५ मुली असून त्यातील ४ जणींचे लग्न झाले आहे. मौलवीनेही दुसरे लग्न केल्यानंतर दुसऱ्या पत्नीने सहा महिन्यांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर मौलवीने तिसऱे लग्न करणार असल्याची माहिती हाजराला दिली.

त्यावर हाजराने आपल्या अविवाहित मुलीचे आधी लग्न कर असे सांगितले. यावरुन बुधवारी दोघांमध्ये वाद झाला. त्या रात्री मौलवी झोपेत असताना हाजराने स्वयंपाकघरातील चाकूने गुप्तांगावर हल्ला केल्याची कबुली हाजराने पोलिसांना दिली. पोलिसांनी हाजराला हत्येसाठी वापरलेल्या चाकूसोबत अटक केली असून तिला तुरुंगात पाठवले आहे.