पुणे ; महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी चार पोलिसांविरोधात गुन्हा


पुणे – पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात चार महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सहायक फौजदाराने मोबाईलवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तर त्याच महिलेस तीन महिला पोलिसांकडून मारहाण करून धमकी देण्यात आली. फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदाराचे रत्नकांत गणपतराव इंगळे (वय ५४), असे नाव असून, त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इतर तीन महिला कर्मचाऱ्यांविरोधात मारहाण आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून सध्या शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये ही महिला राहते. त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संगनमत करून खोटा अर्ज केला होता. त्यानंतर सहायक फौजदार रत्नकांत गणपतराव इंगळे यांनी फिर्यादी महिलेस फोन करून तुझा अर्ज आला आहे, असे सांगत सदरील महिला पोलीस कर्मचाऱ्याशी अश्लील भाषेत संवाद केला. त्या संपूर्ण संभाषणाची फिर्यादीने सीडी तयार केली होती.

दरम्यान, आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणानंतर फिर्यादीच्या घरी जाऊन मोबाईल आपटला आणि संभाषणाची सीडी फोडून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात न घेतल्यामुळे, अखेर फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.