प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल – संजय राऊत


मुंबई – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि युतीसंदर्भात लिहिलेले पत्र आणि सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या राजकारणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर राऊत यांनी ठाकरे यांची भेट घेतली असून, दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली.

राऊत यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बैठकीतील चर्चेविषयी काही मुद्द्यांवर माहिती दिली. प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राविषयीही यावेळी राऊत यांनी महत्त्वाचे भाष्य केले. त्याचबरोबर प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल, असे वक्तव्य राऊत यांनी केले.

आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. मातोश्रीवर तब्बल दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री आहेत. पण, आज माझी चर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झाली. संघटनात्मक काम महत्त्वाचं आहे. भविष्यात पक्ष मजबूत असेल, तर सरकार अधिक काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहिल. त्यासाठी पक्षसंघटेनेचे काम करणे महत्त्वाचे असल्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर सरकारबद्दलही चर्चा झाली. अधिवेशन असल्यामुळे त्यांची तयारी सुरू आहे. मी काही त्यात पडत नसल्याचे राऊत म्हणाले.

आजच्या बैठकीबद्दल बाहेर चर्चा व्हावी, असे काही नाही. सर्वकाही स्थिर स्थावर आणि सुरळीत सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या. कुणी कितीही ढोल बडवले, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल. मी त्याच्याविषयी सगळ्यांना खात्री देतो, असे म्हणत राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी शरद पवार यांनी काही मेसेज दिला होता का? या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, पवार यांचा मेसेज त्याचदिवशी सांगितला. उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहेत. त्यांची लोकप्रियता वाढत आहे. महाविकास आघाडीला याचा फायदा भविष्यात होईल. विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेतले पाहिजे, असे पवार म्हणाले असतील तर त्यात चुकीचे काय? राष्ट्रीय स्तरावर आघाडी उभी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यात प्रादेशिक पक्षांना घेणे योग्यच असल्याचे राऊत म्हणाले.

राऊत प्रताप सरनाईक यांच्या पत्राविषयी बोलताना म्हणाले, माझी मोबाईलवरून प्रताप सरनाईक यांच्यासोबत चर्चा झाली. माझ्याकडे त्यांनी खुलासा केला आहे. सरनाईकांनी स्पष्ट सांगितले की, माझ्या भावना मी व्यक्त केल्या आहेत आणि मी आजन्म शिवसेनेतच राहिल आणि शिवसैनिक म्हणूनच मरेन. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडे मी सुद्धा बोललो आहे. प्रताप सरनाईक यांच्याविषयी तुम्हाला लवकरच बातमी कळेल, असे सांगत राऊतांनी अधिकचे बोलणे टाळले.