डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने जारी केली नवी नियमावली


पुणे – Delta Plus Variant चा नवा धोका देशासह राज्यातही निर्माण झालेला असतानाच महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला. तिसऱ्या टप्प्याच्या वरच महाराष्ट्रातील सर्व जिल्हे असतील, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्यामुळे आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या निर्बंधांमधील सूट मिळू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने देखील शहरातील नियमावलीमध्ये बदल केले असून नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यानुसार, अत्यावश्यक सेवांची दुकाने दररोज संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहणार असून या सेवा वगळता इतर प्रकारच्या दुकानांना फक्त सोमवार ते शुक्रवार यादरम्यानच मुभा देण्यात आली आहे.


पुणे महानगरपालिकेने जारी केलेले हे आहेत नियम?

 • दररोज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकानांना मुभा देण्यात आली आहे.
 • अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. ही दुकाने फक्त सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली राहतील.
 • सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट ५० टक्के आसन व्यवस्थेच्या मर्यादेत सुरू राहतील. पण, शनिवार-रविवार फक्त पार्सल किंवा होम डिलिव्हरीची सेवा उपलब्ध असेल.
 • फक्त सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्येच सामाजिक, धार्मिक किंवा मनोरंजनपर कार्यक्रमांना देखील परवानगी असेल. यासाठी ५० लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. शनिवार-रविवार अशा कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी असणार नाही.
 • शनिवार-रविवारी फक्त संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच जिम, सलून, स्पा या गोष्टी खुल्या राहतील.
 • सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत वाईन शॉप खुली राहतील.
 • मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळे ही बंदच राहतील.
 • पीएमपीएमएल बसेस ५० टक्के क्षमतेने सुर राहतील. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नसेल.
 • पुणे शहरात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर प्रतिबंध असेल. तर संध्याकाळी ५ नंतर संचारबंदी लागू असेल.
 • ई कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवांचा पुरवठा करण्याची परवानगी असेल.
 • लग्न समारंभासाठी ५० लोकांची आणि अंत्यसंस्कारासाठी २० लोकांची परवानगी असेल.
 • पुणे मनपा हद्दीतल्या खासगी कार्यालयांना ५० टक्के कर्मचारी क्षमतेने काम करण्याची परवानगी. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही कार्यालये सुरू राहतील. शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील.

दरम्यान, सोमवारपासून म्हणजेच २८ जूनपासून नव्याने जाहीर करण्यात आलेले नियम लागू होतील, असे देखील पुणे महानगर पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे महानगर पालिकेच्या क्षेत्रातील भागांमध्ये हे नियम लागू असतील.