अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांची १ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी


मुंबई – वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल (२५ जून) दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच चौकशीसाठी त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना ताब्यात घेतले होते. ईडीने चौकशीनंतर दोघांनाही अटक केली. तसेच अनिल देशमुख यांनाही समन्स बजावले आहे. दरम्यान, ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना न्यायालयाने १ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

ईडीकडून परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून, याप्रकरणी ईडी अधिकाऱ्यांनी काल (२५ जून) सकाळपासून पाच ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये देशमुख यांच्या नागपुरातील घराचा देखील समावेश होता. तसेच देशमुख यांच्या नागपुरात व्यवसायातील भागीदार असलेल्या व्यवसायिकाच्या घरीदेखील ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर मुंबईतील देशमुख यांचं शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला, त्यांचे स्वत:चे वरळी येथील घर असलेल्या सुखदा इमारतीत छापा टाकला होता. प्रत्येक छापेमारीवेळी ईडीसोबत सीआरएफ जवानांचे एक पथकही घटनास्थळी होते.

ईडीने या छापेमारीनंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ईडीकडून कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली. दोघांवर पीएमएलए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांची शुक्रवारी रात्री उशिरा वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. त्यानंतर दोघांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. दोघांनाही न्यायालयाने १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.