अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; ईडीने बजावले समन्स, हजर राहण्याची सूचना


मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काल (25 जून) पाच ठिकाणी ईडीने झाडाझडती केल्यानंतर आज अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. आज सकाळी अकरा वाजता दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची सूचना देशमुख यांना करण्यात आली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने काल त्यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले होते.

दरम्यान याआधी अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. मनी लॉण्ड्रिंग (PMLA) प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (26 जून) सकाळी अकरा वाजता त्यांना PMLA कोर्टात हजर केले जाईल. अनिल देशमुख यांच्यावरही ईडी कारवाई करु शकते, असे समजते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. ज्यावेळी याबाबत चर्चा सुरु होती, तेव्हा त्या खोलीत अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे देखील उपस्थित होते.

दरम्यान केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सत्ता गमावल्यामुळे वैफल्यग्रस्तांकडून केला जात आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. विनाकारण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सत्ताधारी पक्षातील त्रास दिला जात आहे, आम्ही सुद्धा पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.