भूतान नरेश पायी फिरून करताहेत जनतेत करोना जागृती

फोटो साभार रॉयटर

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या भूतानचे राजे, ४१ वर्षीय खेसार नामग्याल वांगचुक डोंगरदऱ्यात असलेल्या दुर्गम भागात राहणाऱ्या जनतेची विचारपूस करण्यासाठी कधी पायी, कधी घोड्यावरून तर कधी कार मधून फिरत आहेत. भूतान मध्ये करोना संक्रमण वाढू लागल्याने जनतेमध्ये करोना जागृती करण्यासाठी आणि या काळात काय खबरदारी घ्यावी, कोणते नियम पाळावे हे सांगण्यासाठी राजे जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत.

या काळात भूतान नरेश राजाच्या नाही तर जनता सेवकाच्या भूमिकेत कार्यरत असल्याचे पंतप्रधान डॉ. लोते शेरिंग यांनी सांगितले. लोते शेरिंग सुद्धा राजासमवेत या भागात दौरा करत आहेत. जनतेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी हे प्रयत्न आहेत. भूतान मध्ये गेले १४ महिने करोना आहे आणि हा सर्व काळ राजा जनतेची काळजी घेत आहे. सात लाख वस्तीच्या या देशात जनतेला भेटण्यासाठी राजा आणि पंतप्रधान डोंगर दऱ्या पायी पार करत आहेत. नरेशांना या काळात अनेकदा विलगीकरणात सुद्धा जावे लागले आहे.

पंतप्रधान शेरिंग सांगतात, लोकांना भेटी देण्याचा उपयोग नक्की होतोय. जनता राजाचे म्हणजे गांभीर्याने घेते आहे. करोना काळात तुम्ही एकटे नाही, असा विश्वास नरेश जनतेला देत आहेत. गेल्या दोन महिन्यात भूतान मध्ये करोना मृत्यूचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या अभियानाला अधिक वेग देण्यात आला आहे असे समजते.

राजा पहाडी भागात १४ हजार फुट उंचीवरील वस्त्यांना सुद्धा भेट देत आहेत मात्र या बाबत मुलाखत देण्यास त्यांनी नकार दिला आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुक वरून या प्रवास प्रयत्नांची माहिती दिली जात आहे असे समजते.