कान पकडून उठाबशा, शिक्षा? नव्हे ब्रेन पॉवर योगा

भारतात ज्या व्यक्ती कधीना कधी शाळेत गेल्या आहेत, त्यांना कान धरून उठाबशा काढणे या विषयी नक्कीच माहिती असणार. कित्येक शाळांमध्ये आजही ही शिक्षा म्हणून उपयोगात येते. इतकेच कशाला करोना लॉकडाऊन काळात विना मास्क हिंडणे, लॉकडाऊन मध्ये नियम मोडून बाहेर पडणे असे उद्योग केलेल्या अनेकांना पोलिसांनी भर रस्त्यात लाठी प्रसाद आणि कान पकडून उठाबशा काढायला लावल्याचे फोटो वेळोवेळी झळकले आहेत.

आपल्याकडे विशेषतः दक्षिण भारतात मंदिरात जाणारे अनेक भाविक देवापुढे कान पकडून उठाबशा काढताना पाहायला मिळतात. कान पकडून उठाबशा हा शिक्षेचा प्रकार मानला जातो मात्र ते खरे नाही. या व्यायाम प्रकारामागे विज्ञान आहे. ते समजून घेणे मनोरंजक ठरेल.

कान पकडून उठाबशा काढण्यामुळे लक्ष केंद्रित होते आणि स्मरण वाढते. या प्रकारामुळे आपल्या मेंदूचे अनेक भाग अॅक्टीव्हेट होतात. व्यायाम करताना आवर्जून कान पकडून उठाबशा काढल्या तर पोटाची चरबी कमी होते.

याबाबत झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, १ मिनिट कान पकडून उठाबशा काढल्या तर अल्फा वेव्हची कार्यक्षमता वाढते. कानाच्या पाळ्या दाबल्या गेल्याने तेथील महत्वाचे अॅक्यूप्रेशर पॉइंटस उत्तेजित होतात आणि मेंदूचा डावा आणि उजवा भाग कार्यरत होतो. शरीराच्या अनेक हालचाली, बोलणे, स्मरण मेंदूच्या आदेशावर होत असतात त्याला चालना मिळते.

अमेरिकन शाळांमधून मुलांना कान धरून उठाबशा काढण्यात रुची वाटावी म्हणून तेथे या साठी वर्कशॉप घेतली जातात. फक्त या प्रकाराला सुपर ब्रेन योगा असे म्हटले जाते. आता बोला !