व्हॅटीकन सिटी मध्ये पोप ना भेटायला आला स्पायडरमॅन

बुधवारी व्हॅटीकन सिटी मध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटायला आलेल्या नागरिकांची नजर पोप यांच्यावरून दुसरीकडे वळण्याची किमया घडली. ही किमया घडविली स्पायडरमॅनने. एक व्यक्ती स्पायडरमॅनचा पोशाख करून पोप यांच्या भेटीसाठी आली. तिने पोप फ्रान्सिस यांच्याशी हस्तांदोलन सुद्धा केले. अर्थात ही भेट एका खास कारणासाठी होती. स्पायडरमॅन बनून आलेल्या व्यक्तीचे नाव मॅटीयो विलरडीटा असल्याचे एपी न्यूज मध्ये म्हटले आहे.

मॅटीयो विलरडीटा हे नेहमीच स्पायडरमॅनचा पोशाख करून रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या लहान मुलांना भेटायला जातात. मुलांना स्पायडरमॅनच्या भेटीने आनंद होतो आणि हा स्पायडरमॅन या आजारी मुलांचे मनोरंजन करतो. पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन मॅटीयो विलरडीटाने पोप ना या आजारी मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करावी अशी विनंती केली.

मॅटीयो विलरडीटा म्हणतात, पोप यांच्या भेटीने मला खूप उत्साह आलाच पण पोपनी पाहताक्षणी माझे मिशन काय असले ते ओळखले. व्हेटीकन मध्ये या वेळी उपस्थित असलेल्या अनेक तरुणांनी या स्पायडरमॅनचे फोटो काढले. इटली मध्ये करोना प्रादुर्भाव वाढला होता आणि लॉकडाऊन होता, त्यामुळे मॅटीयो विलरडीटा उर्फ स्पायडरमॅन लहान मुलांना प्रत्यक्ष भेटू शकला नव्हता. त्यावेळी त्याने १४०० व्हिडीओ बनवून आजारी मुले आणि माणसे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले असे समजते.