भारतातील या सप्तपुरी आहेत मोक्ष नगरी

हिंदू धर्मानुसार मनुष्ययोनी मिळण्यासाठी ८४ लाख जन्म घ्यावे लागतात. मनुष्यजन्म मिळाला की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळावी म्हणून मोक्ष मिळविण्यासाठी प्रयत्न करायचा अशी कल्पना आहे. भारतात मोक्षनगरी म्हणून सात शहरांना प्राचीन काळापासून मान्यता मिळाली आहे. या सात शहरांना सप्तपुरी असेही म्हटले जाते. ही सर्व स्थळे भारताच्या एकता आणि अखंडतेचे प्रतिक मानली जातात. अयोध्या, मथुरा, द्वारका, वाराणसी, हरिद्वार, उज्जैन आणि कांचीपुरम अशा या सात नगरी आहेत. त्यांच्याविषयी थोडी माहिती आमच्या वाचकांसाठी.

अयोध्या ही मनु ने निर्माण केलेली नगरी शरयू नदीकाठी वसलेली आहे. भगवान रामाचे हे जन्मस्थळ. राम अयोध्येचा राजा आणि मर्यादा पुरुषोत्तम होता. रामायण महाकाव्य रामाच्या जीवनावरच लिहिले गेले असून हा प्रवित्र ग्रंथ मानला जातो. रामजन्मभूमी वाद आणि आता येथे उभारले जात असलेले भव्य मंदिर यामुळे ही नगरी जगात प्रसिद्ध झाली आहे.

वाराणसी नगरी काशी, बनारस या नावांनीही ओळखली जाते. या नगरीत ज्याला मृत्यू येतो त्याला मोक्ष मिळतो अशी प्राचीन समजूत आहे. गंगाकिनारी वसलेली ही नगरी देशातील प्राचीन नगरी असून येथे अक्षरशः शेकडो मंदिरे आहेत. येथील काशी विश्वनाथ मंदिर भोलेनाथाच्या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.

मथुरा ही कृष्ण नगरी म्हणून ओळखली जाते. येथे भगवान कृष्ण जन्माला आले. कृष्णाचे बालपण येथेच गेले. या नगरीत सुद्धा अनेक मंदिरे आहेत.

हरिद्वार हे पवित्र मानले गेलेले शहर उत्तराखंड राज्यात गंगेकाठी वसलेले आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभ मेळा भरतो. लाखो भाविक हरिद्वारला या काळात भेट देतात. ही विष्णूनगरी म्हणून ओळखली जाते.

कांचीपुरम ही दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यात वसलेली नगरी भव्य मंदिरांचे शहर म्हणून मान्यता पावलेली नगरी आहे. कांची असेही या नगरीला म्हटले जाते. येथील कामाक्षी मंदीर जगप्रसिध्द असून हे शहर कांचीपुरम सिल्क साडी साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. येथे वरदराज पेरूमल, एकम्बेश्वर अशी अनेक भव्य मंदिरे आहेत.

उज्जैन हे मध्यप्रदेशातील शहर क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे. पवित्र नर्मदा नदीचे दुसरे नाव क्षिप्रा असे आहे. इसवी सन ७०० पूर्वी हे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित झाले होते. समुद्र मंथनाच्या वेळी झालेल्या देव दानव युद्धात ही नगरी निर्माण झाली असे सांगतात. येथील महांकालेश्वर १२ ज्योतिर्लिंगातील एक स्थान आहे. ही राजा विक्रमादित्याची नगरी म्हणूनही ओळखली जाते.

द्वारका हे शहर गुजराथची पहिली राजधानी होते. पाच हजार वर्षापूर्वी भगवान कृष्ण मथुरा सोडून द्वारकेत आले आणि त्यांनी ही नगरी वसविली अशी मान्यता आहे. येथील द्वारकाधीश मंदिर जगात प्रसिद्ध असून कृष्ण जीवनाशी जोडलेल्या अनेक कथा या नगरीशी संबंधित आहेत.