कंगना साकारणार इंदिरा गांधी

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मात्र यावेळी आगामी चित्रपटामुळे कंगना चर्चेत आहे. सोशल मिडिया ‘कु’ प्लॅटफॉर्मवर कंगनाने या चित्रपटाची माहिती दिली असून ती यात भारताच्या माजी पंतप्रधान, दिवंगत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे कंगना या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणूनही काम करणार आहे. कंगनाच्या म्हणण्यानुसार तिच्या सारखे चांगले दिग्दर्शन कुणी करू शकत नाही. यापूर्वी कंगनाने मणीकर्णिका, क्वीन ऑफ झाशी यात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारताना दिग्दर्शन सुद्धा केले आहे.

इंदिरा गांधी यांच्यावरील आगामी चित्रपटाबाबत ती म्हणते हा चित्रपट इंदिरा गांधी यांची बायोपिक नाही. चित्रपटाचे नाम ‘इमर्जन्सी ‘ आहे. गेले वर्षभर कंगना या चित्रपटासाठी तयारी करते आहे आणि या चित्रपटासाठी तिने अनेक चांगले चित्रपट हातचे सोडले आहेत. या चित्रपटाचे लेखन रितेश शहा करणार आहेत. इंदिरा गांधी यांच्या सारखे दिसण्यासाठी कंगनाने बॉडी स्कॅन करून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

कंगनाचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित थलावई ची हिंदी आवृत्ती लवकरच रिलीज होणार आहे.