सर्वोच्च न्यायालयाचे दहावी, बारावीचे निकाल ३१ जुलैपूर्वी लावण्याचे आदेश


मुंबई – एकीकडे देशातील अनेक राज्यांनी निर्माण झालेल्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामध्ये दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने देखील सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर त्यापाठोपाठ आयसीएसई बोर्डाने देखील तसाच निर्णय जाहीर केला आहे.

पण, आता सर्व बोर्डांच्या मूल्यांकनाच्या पद्धती निरनिराळ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र निकालाची चिंता लागली आहे. कारण याच गुणांच्या आधारावर पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच सर्व राज्यांमधील बोर्डांना मूल्यांकनानंतरचे निकाल ३१ जुलैपूर्वी लावण्याचे आदेश दिल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिलासा ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका रद्द ठरवत निर्णय योग्यच असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या ३०:३०:४० फॉर्म्युल्यावर आक्षेप घेणारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती. ती याचिका देखील रद्द ठरवत न्यायालयाने मूल्यांकनाची पद्धती योग्य असल्याचे म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्यांमधील बोर्डांना ३१ जुलैपूर्वी निकाल लावण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रत्येक राज्यामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याची वेगवेगळी पद्धती असू शकेल. त्यामुळे यासंदर्भात येत्या १० दिवसांमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे, त्याची माहिती देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता या सर्व मूल्यांकन प्रक्रियेमध्ये एकसूत्रता नसली तरी सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. तसेच, निकाल ३१ जुलैपूर्वी लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी देखील पुढील प्रवेश आणि शिक्षण प्रक्रिया सुलभ होऊ शकणार आहे.

मूल्यमापनाच्या पद्धतीनुसार, यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रीलियम परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील. दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून या प्रकरणानंतर सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आज हा ठराव पारित केल्यानंतर आता अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधातील आपला पवित्रा भाजप अधिक आक्रमक करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरून देखील विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकता आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळू शकतात.