पुणे न्यायालयाची आंबिल ओढा कारवाईला स्थगिती


पुणे – महानगरपालिकेने आंबिल ओढा परिसरात वास्तव्यास असलेल्या स्थानिकांच्या घरांवर आज सकाळी बुलडोजर चालवला. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस या कारवाईवरून आमनेसामने आल्याचेही बघायला मिळाले. पण महानगरपालिकेने स्थानिकांना बाजूला सारत पाडापाडीची कारवाई सुरूच ठेवली होती. महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी याचिकाकर्त्यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

महानगरपालिकेने पुण्यातील आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरांवर हातोडा चालवला. महानगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी कारवाई करण्यास सुरूवात केली. दरम्यान कारवाई मागे महानगरपालिका नसून बिल्डर असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. मात्र, नंतर ही कारवाई पुणे महानगरपालिकेनेच केल्याचे समोर आले. तसा खुलासा महानगरपालिकेने स्वतः केला. त्याचबरोबर बिल्डरनेही त्यावर खुलासा केला आहे.

महानगरपालिका आणि बिल्डरने खुलासा केला असला, तरी घरांची पाडापाडी मात्र, सुरूच होती. काही स्थानिक नागरिकांनी वकिलांच्या मार्फत याविरोधात पुणे न्यायालयात आव्हान दिले. यावर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने अतिक्रमणाच्या कारवाईला स्थगिती दिली. याबद्दलची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिली. न्यायालय म्हणाले, हे लोक विस्थापित होणार आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्याचे कोणतेही रेकॉर्ड न्यायालयासमोर नसल्यामुळे लोकांना उद्ध्वस्त करणे उचित ठरणार नाही, त्यामुळे जोपर्यंत या लोकांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत पुणे महानगरपालिकेच्या पाडापाडीच्या कारवाईला स्थगिती देत आहोत. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना दुपारपर्यंत थांबा, असे आम्ही वारंवार सांगून देखील ऐकले नाही. त्यामुळे आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी अविनाश सपकाळ यांना साडी आणि बांगड्या भेट देणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आंबिल ओढा परिसरात केलेली कारवाई ही सर्व नियम पाळून केलेली आहे. यासंदर्भात नागरिकांना अनेकदा वैयक्तिक आणि वर्तमानपत्रांमधूनही नोटिसा पाठवण्यात आल्या. महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबतही यासंदर्भात तीन ते चार वेळा बैठका झाल्या आहेत. त्यामुळे येथील सर्व नागरिकांना हे माहित आहे की, आपले पुनर्वसन जवळच २०० मीटरवर असलेल्या राजेंद्रनगरमध्ये होणार आहे. सर्वांना तिकडे सुसज्ज फ्लॅट्स महानगरपालिकेने दिलेले आहेत. उद्या नाल्याला पूर येऊन काही होऊ नये, यासाठी सध्या हे काम करणे आवश्यक असल्याचे सांगत महानगरपालिकेनं अतिक्रमण कारवाईचे समर्थन केले.