काल दिवसभरात 50 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर 1321 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पण, अद्याप धोका टळलेला नाही. देशात पुन्हा एकदा 50 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 54,069 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1321 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात सलग 42व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांहून अधिक कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा आहे. देशभरात 23 जूनपर्यंत 30 कोटी 16 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 64 लाख 89 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 39 कोटी 78 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असलेला दिसून येत आहे. मात्र मंगळवारच्या तुलनेत काल कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. काल 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मंगळवारी 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती आणि 9 हजार 046 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

राज्यभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 57,53,290 एवढी झाली आहे. काल (बुधवारी) 163 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.93 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,01,28,355 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,97,587 (14.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,92,108 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,223 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल रोजी एकूण 1,21,859 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.