
पुणे : महानगरपालिकेच्या वतीने आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. यावेळी काही नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक आक्रमक
महापालिकेने पावसाळा सुरु असताना जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण काढण्यास सुरु केल्यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढले आहे.
पुणे महापालिकेच्या मालकीचा आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट असून येथील केदार बिल्डर्सकडून रहिवाशांना अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही जागा महानगरपालिकेची असली तरी महानगरपालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत बुधवारी बैठक झाली होती. त्या बैठकीत अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिलेले असतानाही आज सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
शहरातील अनेक बिल्डर्संची आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोणतीही नोटिस महानगरपालिकेच्या वतीने आली नसल्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे येथे राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न न करता महानगरपालिकेकडून ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे. दरम्यान पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी ही कारवाई अचानक करण्यात आली नसून पूराची परिस्थिती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. फक्त या लोकांचे पर्यायी पुनर्वसन केले जायला हवे असे सांगितले.
