मुलगा हंटरमुळे जो बायडेनना मान खाली घालण्याची वेळ

अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांचा मुलगा हंटर याच्यामुळे बायडेन याच्यावर मान खाली घालण्याची वेळ आली आहे. या संदर्भात न्युयॉर्क पोस्टने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार हंटर याने २०१८ साली एका कॉलगर्ल बरोबर रात्र घालविताना तिला द्यायचे पैसे वडील बायडेन याच्या खात्यातून दिले. ही रक्कम थोडी थोडकी नाही तर २५ हजार डॉलर्स म्हणजे १८ लाख रुपये आहे. अर्थात बायडेन यांना या गोष्टीची अजिबात माहिती नव्हती असेही सांगितले जात आहे.

बातमीत म्हटल्यानुसार हंटर याने हॉलीवूडच्या चेरॉ मॉरमोंट हॉटेल मध्ये कॉलगर्ल बरोबर रात्र घालविली होती. त्यावेळी त्याने अश्लील व्हिडीओ तयार केले. मे महिन्यात केलेल्या या प्रवासात हंटरने एमराल्ड फँटसी गर्ल या भाड्याने मुली पुरवणाऱ्या माध्यमातून हिरवे डोळे असलेल्या, रशियन, ‘याना’ नावाच्या मुलीची निवड केली होती. यावेळी हंटरने खोटे नाव घेतले होते आणि मद्य प्राशन केले होते. पेमेंट करताना त्याच्या खात्यातून पैसे जाईनात तेव्हा त्याने वडिलांच्या खात्यातून पैसे भरले होते.

ही सर्व माहिती हंटरच्या लॅपटॉप मधून मिळाल्याचा दावा केला जात आहे. हा लॅपटॉप हंटर डायरीप्रमाणे वापरतो. त्यात अनेक मेसेजेस, फोटो, ई मेल्स, चॅटस, अनेक सेल्फी आहेत. हा लॅपटॉप हंटरने दुरुस्ती साठी पाठविला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.