जगप्रसिध्द, पण उद्घाटनाविना राहिला हा पूल
जगात अनेक प्रकाराचे पूल बांधले गेले असून त्यातील काही पुलांनी वेगळी ओळख मिळविली आहे. काही पूल त्या त्या देशांची शान बनले आहेत. असाच एक पूल भारतात आहे. हा पूल जगात प्रसिद्ध आहे मात्र विशेष म्हणजे आज ७७ वर्षे उलटून गेली तरी या पुलाचे अधिकृत उद्घाटन झालेले नाही. आपल्याकडे श्रेय घेण्यासाठी एकच पुलाचे उद्घाटन वेगवेगळे राजकीय पक्ष नेते अनेकवेळा करण्याचे प्रकार घडतात मात्र इतिहासात नोंदला गेलला हा पूल उद्घाटनाविना राहिला आहे.
हा पूल आहे कोलकाता शहराचे भूषण असलेला हावडा ब्रीज. दुसऱ्या महायुद्ध काळात डिसेंबर १९४२ मध्ये या पुलाजवळ जपानी बॉम्ब पडले तरी ताठ राहिलेला. बीबीसी रिपोर्ट नुसार १९ व्या शतकात शेवटच्या दशकात ब्रिटीश इंडिया सरकारने कोलकाता आणि हावडा यांच्या मध्ये हुगली नदीवर तरंगता पूल बांधण्याची योजना आखली होती. त्या काळी या नदीतून जहाजांची मोठी आवकजावक होती त्यामुळे जहाजांना अडथळा ठरू नये म्हणून नदीच्या दोन तीरांवर खांब उभारून त्यावर हा पूल बांधला जावा यासाठी १८७१ मध्ये हावडा ब्रीज अॅक्ट मंजूर केला गेला होता.
१९३६ रोजी या पुलाचे प्रत्यक्ष काम सुरु झाले आणि १९४२ मध्ये ते पूर्ण झाले. ३ फेब्रुवारी १९४३ रोजी हा पूल सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला गेला. त्यावेळी तो जगात तीन नंबरचा सर्वाधिक लांबीचा पूल होता. १९६५ मध्ये या पुलाचे नामकरण रविंद्रनाथ सेतू असे केले गेले. हा पूल बांधण्यासाठी २६५०० टन स्टील वापरले गेले आणि त्यातील २३५०० टन स्टील टाटा स्टीलने पुरविले होते. हुगली नदीच्या दोन तीरांवर २८० फुट उंचीच्या खांबांवर हा पूल आहे. या दोन खांबातील अंतर १५०० फुट असून विशेष म्हणजे पुलाच्या स्टील प्लेट जोडताना नटबोल्ट नाही तर लोखंडी खिळे वापरले गेले आहेत.
२०११ मध्ये तंबाखू खाऊन थुंकण्याच्या भारतीय सवयीचा फटाका या पुलाला बसला. लोकांनी पुलाच्या खांबांवर पिचकाऱ्या मारण्याचे सुरु ठेवल्याने पुलाच्या पायाची रुंदी घटू लागली म्हणून तेथे फायबर ग्लासचे कव्हर २० लाख रुपये खर्चून बसविले गेले असे सांगितले जाते.