२०२० मध्ये जेवढे मोबाईल विकले गेले आणि त्यातील जेवढे ऑनलाईन विकले गेले त्यात भारतीयांनी ४५ टक्के फोन ऑनलाईन खरेदी करून जगात एक नंबरचे स्थान मिळविले आहे. या संदर्भात काउंटर पॉइंटचा एक अहवाल सादर झाला आहे. त्यानुसार गतवर्षी जगभरात २६ टक्के मोबाईल विक्री ई कॉमर्स माध्यमातून झाली. म्हणजे प्रत्येक चार फोन मागे एक फोन ऑनलाईन खरेदी केला गेला. कोविड १९ ने खरेदी पॅटर्न बदलण्यात मोठी भूमिका पार पाडली.
जगातील प्रमुख देशात ऑनलाईन मोबाईल विक्रीचे आकडे पाहिले तर भारतात सर्वाधिक म्हणजे ४५ टक्के मोबाईल ऑनलाईन खरेदी करण्यात आले. त्यापाठोपाठ ब्रिटन ३९ टक्के, चीन ३४ टक्के, ब्राझील ३१ टक्के, अमेरिका २४ टक्के, द. कोरिया १६ तर नायजेरिया ८ टक्के असे हे प्रमाण आहे. ऑनलाईन मोबाईल विक्रीत गतवर्षात ६ टक्के वाढ नोंदविली गेली. २०२१ मध्ये ही वाढ थोडी कमी असेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
भारतात व्यवसाय करणाऱ्या बहुतेक मोबाईल कंपन्या स्मार्टफोन विक्री ऑनलाईन करत आहेत. शाओमी, रियल मी, ओप्पो, पोको, विवो, सॅमसंग, टेक्नो या कंपन्या त्यात आघाडीवर आहेत. ऑनलाईन खरेदीत भारतीय ग्राहकाला फायदा मिळतो. खास बँकेच्या कार्डवर खरेदी केली तर कॅश बॅक मिळतो त्यामुळेही भारतीय ग्राहक ऑनलाईन मोबाईल खरेदीला पसंती देतात असे दिसून आले आहे.