आजची पौर्णिमा खास, दिसणार हनी मून

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. मात्र परदेशात जून मध्ये येणारी पौर्णिमा आणि त्यादिवशीचा चंद्र अनेक नावांनी ओळखला जातो. सूर्य मावळल्यावर आकाशात चंद्र उगवला की एक वेगळाच प्रकाश भूतलावर पसरतो. हा चंद्र १५०० सालापासून हनी मून या नावाने ओळखला जातो. मात्र विवाहाशी त्याचा काही संबंध नाही.  या काळात मधमाशांची पोळी मधाने भरून वाहू लागतात आणि परदेशात मध काढण्याच्या कामाची सुरवात यावेळी केली जाते म्हणून हा हनी मून.

अर्थात या चंद्राला स्ट्रॉबेरी मून, हॉट मून, रोझ मून अशीही नावे आहेत. नासा वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार आज २४ जून रोजी चंद्र पृथ्वीच्या चारी बाजूनी अंडाकार कक्षेत फिरत असताना पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो त्यामुळे तो मोठा दिसतो. अमेरिकेतील एल्गोनक्वीन आदिवासी या दिवशी स्ट्रॉबेरी तोडणी सुरु करतात म्हणून त्याला स्ट्रॉबेरी मून म्हटले जाते. हा चंद्र लाल रंगाचा नसतो तर चमकदार पिवळा पण किंचित लालसर दिसतो.

परदेशात जून हा उन्हाळा सुरु होण्याचा महिना. त्यामुळे या जून मधील पौर्णिमेच्या चंद्राला हॉट मून असेही म्हटले जाते. जगभरात अनेक देशात या दिवशी गुलाब तोडणी सुरु होते म्हणून तो रोझ मून म्हणूनही ओळखला जातो.