कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील विराट कोहली सर्वात जास्त लाडावलेला क्रिकेटपटू


नवी दिल्ली – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या शेवटच्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा दोघेही खेळ सुरु झाल्याच्या अर्ध्या तासातच तंबूत परतले. विराटकडून या ऐतिहासिक कसोटी सामन्यामध्ये शतकाची अपेक्षा काही क्रिकेट चाहत्यांना होती. पण पटापट धावा करुन न्यूझीलंडला शेवटचे काही तास खेळण्यासाठी देत सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न भारत करेल अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना होती. पण शेवटच्या दिवसाची सुरवात भारतासाठी फारशी चांगली झाली नाही. खेळ सुरु झाल्यानंतर काही षटकांमध्येच विराट माघारी परतल्यानंतर काही वेळातच चेतेश्वर पुजाराही माघारी परतला. विराट झटपट बाद झाल्यामुळे आता त्याच्यावर टीका केली जात आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३० षटकात २ बाद ६४ अशी धावसंख्या उभारली होती. तिथून पुढे खेळ सुरु झाल्यानंतर ३५ व्या चेंडूवर विराट तंबूत परतला. १३ धावा करुन कोहली तंबूत परतला. विराटला काईल जेमीसनने बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये जेमीससने विराटला बाद करण्याची ही तिसरी वेळ आहे. विराटला कसोटीमध्ये जेमीसनने एकूण ८४ चेंडू टाकले असून त्यामध्ये विराटने ३० धावा केल्या आहेत. तर विराट तीन वेळा बाद झाला आहे. जेमीसनविरोधीतील विराटची सरासरी ही अवघी १० एवढी आहे.


कोहली बाद झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्याकडून अधिक चांगल्या खेळाची अपेक्षा होती असे मत सोशल नेटवर्किंगवर व्यक्त केले. कोहली हा सोशल नेटवर्किंगवर ट्रेंडिंग टॉपिक झाला आहे. त्यातच श्रीलंकेमधील एक क्रिकेट वेबसाईट चालवणाऱ्या डॅनियल अॅलेक्झॅण्डरने केलेले ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. विराटची मागील दीड वर्षांमधील कामगिरी आपल्या ट्विटमध्ये डॅनियलने सांगितली आहे.

विराट कोहलीची १ जानेवारी २०२० पासून कसोटी क्रिकेटमधील सरासरी २४.६४ एवढी आहे. आठ कसोटी सामने, १४ खेळी आणि ३४५ धावा. मागील ४१ इनिंगमध्ये विराटला एकही शतक झळकावता आलेले नाही. विराटने २०१९ साली २३ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरोधात शेवटचे शतक झळकावल्याचे डॅनियलने म्हटले आहे. त्याचबरोबर क्रिकेटच्या इतिहासातील विराट हा सर्वात ओव्हर रेटेड क्रिकेटपटू असल्याचा शेराही डॅनियलने दिला आहे.