राज्यातील आगामी जि.प. आणि पंचायत सदस्यपदासाठीच्या पोटनिवडणुकांवरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले


मुंबई – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्यामुळे राज्य सरकारने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त दोनच दिवसात उरकण्याचा निर्णय घेतला आहे. पण, असे असताना राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या २०० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी पुढील महिन्यात मतदान होणार असून त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आता कठोर शब्दांत टीका करायला सुरुवात केली आहे.

यासंदर्भात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी या निवडणुकांवरून थेट राज्य सरकारला उघड आव्हानच दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सत्ताधारी महाविकास आघाडीला सुनावले आहे.

आम्ही या निवडणुकांच्या विरोधात आंदोलन तर करणारच आहोत. पण तरीही या सरकारचा जर निवडणुका लढवण्याचा डावच असेल, तर या सगळ्या जागांवर भाजप फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. त्या जागा आम्ही ओबीसींसाठी आरक्षित असल्याचे समजून ओबीसी उमेदवार लढवू. ओबीसींना जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजप शांत बसणार नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.