आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत कोहलीसह 3 भारतीय टॉप 10 मध्ये


दुबई – भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या रविंद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा निकाल लागण्याआधीच कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. ३२ वर्षीय जडेजाचे सर्वाधिक म्हणजेच ३८६ पॉइण्ट्स असून वेस्ट इंडिज संघाचा कर्णाधार जेसन होल्डर आणि इंग्लंडचा बेन स्ट्रोक्स हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मागील क्रमावारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या होल्डरचे २८ पॉइण्ट कमी झाले आहेत. त्यामुळेच जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये ऑक्टोबर २०१८ नंतर पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. आर. अश्विनचाही या यादीमध्ये समावेश आहे. या यादीमध्ये अश्विन चौथ्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या यादीमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे सध्या सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र दिसत आहे.

कसोटीमधील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा चौथ्या स्थानी आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत आणि रोहित शर्मा या दोन भारतीय खेळाडूंचाही कसोटीमधील अव्वल १० फंलदाजांमध्ये समावेश आहे. ७४७ अंकांसहित पंत आणि रोहित शर्मा दोघेही संयुक्तरित्या या यादीत सहाव्या स्थानावर आहेत.