सर्वात आनंदी देशाला भेडसावते आहे ही चिंता

जगात सर्वाधिक आनंदी देश हा खिताब सलग चार वर्षे मिळविणाऱ्या फिनलंडला एक चिंता सतावते आहे. या देशाला माणसे हवीत आणि ती मिळत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या देशातील लोकांनी येथे स्थलांतर करावे आणि स्थायिक व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. या देशात वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे त्यांना काम करायला कर्मचारी, कामगार मिळत नाहीत. आकडेवारी सांगते दर १०० माणसांमध्ये वृद्ध नागरिक प्रमाण ३९.२ टक्के असून इतके नागरिक ६५ किंवा त्याहून जास्त वयाचे आहेत.

जगात सर्वाधिक वृद्ध जपान मध्ये असून त्यानंतर दोन नंबरवर फिनलंड आहे. संयुक्त राष्ट्र अहवालानुसार २०३० पर्यंत या देशात वृद्ध प्रमाण ४७.५ टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे येथील सरकारने ५५.२ लाख लोकांना राष्ट्रीय सार्वजनिक सेवा सुरु ठेवणे आणि पेन्शन नुकसान कमी करण्यासाठी इमिग्रेशन दरवर्षी २० ते ३० हजारावर नेणे आवश्यक असल्याचा इशारा दिला आहे. हा देश युरोपीय संघाचा सदस्य आहे.

फिनलंडचे क्षेत्रफळ ३,३८,१४५ किमी असून १९१७ पर्यंत हा देश रशियन अमलाखाली होता. रशियन क्रांतीनंतर त्याला स्वातंत्र मिळाले. १९०६ सालापासून येथे महिला आणि पुरुष दोघांना मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. लैगिक समानता स्वीकारणारा हा जगातील पहिला देश आहे.