येतेय झायडस कॅडिलाची पहिलीच डीएनए बेस्ड करोना लस

भारतीय फार्मा कंपनी झायडस कॅडिला त्यांच्या झायकोव-डी या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी सेंट्रल ड्रग रेगुलेटरी कडे या आठवड्यात अर्ज करणार असून त्याला मंजुरी मिळाली तर ही लस जगातील पहिली डीएनए बेस्ड करोना लस ठरणार आहे. भारतात या लसीमुळे करोना लसींची संख्या चार वर जाईल. देशात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि रशियन स्पुतनिक ५ करोना लसी वापरल्या जात असून या तिन्ही लसी डबल डोस आहेत.

जॉन्सन आणि स्पुतनिक लाईट या सिंगल डोस लसी भारतात लवकरच उपलब्ध होणार असल्या तरी झायकोव डी ही वेगळीच लस असून तिचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. फेज १ आणि फेज २ च्या चाचण्यात या लसीचे तीन डोस अधिक काळ पर्यंत प्रतिकार शक्ती देतात असे दिसून आले आहे. अर्थात या लसीच्या दोन डोसची चाचणीही केली जात आहे.

ही लस निडलफ्री म्हणजे इंजेक्शन नको या स्वरुपाची आहे. लस देण्यासाठी जेट इंजेक्टरचा वापर होणार आहे. यात शरीरात सुई न घालता हाय प्रेशरने लस शरीरात घातली जाते. जेट इंजेक्टरचा शोध १९६० साली लागला मात्र त्याच्या वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २०१३ साली परवानगी दिली आहे. अमेरिकेत याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो तसेच युरोप आफ्रिकेत सुद्धा काही देशात त्याचा वापर होतो.

जेट इंजेक्टर मुळे वेदना कमी होतात शिवाय इन्फेक्शनचा धोका कमी होतो. झायडस कॅडिलाच्या झायकोव डी लसीच्या १२ ते १८ वयोगटावर चाचण्या सुरु झाल्या असून वर्षाला २४ कोटी डोस उत्पादन केले जाईल असा दावा कंपनीने केला आहे. म्हणजे दर महिन्याला दोन कोटी डोस तयार केले जाणार आहेत. पहिला दिवस, मग २८ आणि मग ५६ दिवस असे लसीचे वेळापत्रक असेल. ही लस सर्वसामान्य तापमानात दीर्घ काळ चांगली राहू शकते असे समजते.