नोयडा शुटींग रेंजला चंद्रो तोमर यांचे  नाव- योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशात नोयडा येथे सुरु झालेल्या शुटींग रेंजला शुटर दादी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या चंद्रो तोमर यांचे नाव दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. एप्रिल महिन्यात ३० तारखेला चंद्रो तोमर यांचे करोना मुळे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. योगी आदित्यनाथ यांनी टीम ९ बैठकीत वरील घोषणा करताना ‘चंद्रो तोमर जिद्द, कौशल्य आणि नारी सशक्तीकरणाचे अप्रतिम प्रतिक’ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, उत्तरप्रदेश सरकारच्या मिशन शक्ती अभियानातील हा पहिला प्रयत्न आहे. हे मातृशक्तीला नमन आहे. त्यामुळे युवकांना प्रेरणा मिळेल.

वयाच्या ६६ व्या वर्षी निशानेबाजी शिकायला सुरवात केलेल्या चंद्रो बागपत येथे गेली २३ वर्षे महिला सशक्तीकरणाचा आवाज बनून राहिल्या होत्या. नातीला शुटींग रेंज मध्ये घेऊन जाताना सहज म्हणून त्यानी रिव्होल्व्हर हातात घेतले आणि निशाणा डागला परफेक्ट १० चा. तेव्हा तेथील प्रशिक्षण डॉ. राजपाल सिंग आणि फारुख पठाण यांनी दादी चंद्रोला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि दादी निशाणेबाज बनली. जगभरात तिने उत्तरप्रदेशाला ओळख मिळवून दिली. दादीने असंख्य पदके मिळविली. सोशल मीडियावर त्या सक्रीय होत्या, त्याच्या जीवनावर चित्रपट निघाला आहे. रिव्होल्व्हर दादी, शुटर दादी, निशाणेबाज दादी, ट्विटर दादी अशी अनेक नावे त्यांना मिळाली होती.