काल दिवसभरात 42,640 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 1167 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधितांच्या संख्येचा आलेख आता उतरताना दिसत आहे. देशात 91 दिवसांनी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 42,640 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1167 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात सलग 40व्या दिवशी कोरोनाबाधितांहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशभरात 21 जूनपर्यंत 28 कोटी 87 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 86 लाख 16 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 39 कोटी 40 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 16 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.

देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट जवळपास 96 टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन 3 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या यादीत जगभरात भारत तिसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आली आहे. काल 6,270 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल 13,758 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,33,215 एवढी झाली. काल कोरोनामुळे 94 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.