जगभरातील देशांना 5.5 कोटी कोरोना प्रतिबंधक लसी देणार अमेरिका


वॉशिंग्टन : संपूर्ण जगभरावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप म्हणावे तेवढे नियंत्रणात आलेले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात माजलेला हाहाकार काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. सध्या लसीकरण हेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र आहे. दरम्यान, सोमवारी एक महत्वाची घोषणा अमेरिकेने केली. जगभरातील देशांना 5.5 कोटी कोरोनाच्या लसी अमेरिकेकडून देण्यात येणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक 1.6 कोटी लसी या भारत आणि बांग्लादेशसारख्या आशियाई देशांना मिळणार आहेत.

अमेरिकेकडून या आधी अडीच कोटी लसींची मदत करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्यात 5.5 कोटी लसींची भर पडली असून ती एकूण आठ कोटींवर गेली आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या लसीकरणाने एक महत्वाचा टप्पा गाठल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ही घोषणा केली आहे. अमेरिकेसोबतच जगभरातील कोरोना संपवण्याच्या उद्देशाने आपण या लसी इतर देशांना उपलब्ध करुन देत असल्याचे बायडेन प्रशासनाने सांगितले आहे.

याबाबत व्हाईट हाऊसने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी इतर देशांना लसी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत निर्मिती होणाऱ्या एकूण आठ कोटी लसींचे वितरण जगभरातील देशांना जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करण्यात येणार आहे.

अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या या आठ कोटी लसींपैकी 75 टक्के लसी या कोव्हॅक्स कार्यक्रमाच्या अंतर्गत वितरित केल्या जाणार आहेत. उरलेल्या 25 टक्के लसी या ज्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे, त्या देशांना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये भारत, बांग्लादेश आणि इतर आशियाई देशांचा समावेश होतो.