सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण 10 टक्क्यांच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. नागरिकांनी गाफील न राहता बाजारपेठेमध्ये गर्दी करु नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन स्वत:ला व दुसऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खरबदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
नागरिकांनी गाफिल राहून गर्दी करु नये – बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले. प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळले पाहिजे व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, असे आवाहन करुन पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली आहे.
कुणीही कोरोना गेला, असे समजू नये प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. लग्न समारंभामध्ये मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्न समारंभात फोटो काढताना मास्क घालत नाहीत यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. लग्न समारंभातील उपस्थितांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
लसीकरणाच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण, दुर्गम भागातील नागरिकांचे होणार लसीकरण
जिव्हिका हेल्क केअरकडून लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गावापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील, वाड्यावस्त्यावर ही रुग्णवाहिका जाणार असून येथील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दिशा निर्देश देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.