रोम – कोरोनाने गेल्या वर्षी इटलीमध्ये थैमान घातल्यानंतर मागील अनेक पिढ्यांनी पाहिली नसेल अशी भयंकर स्थिती इटलीमध्ये निर्माण झाली होती. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या अवघी सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये होती. त्याच इटलीमध्ये आता मास्क घालणे अनिवार्य नसणार आहे. २८ जूनपासून इटलीमध्ये, मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे आणि संपूर्ण देश मास्क फ्री होणार आहे.
यशस्वी लसीकरणानंतर ‘या’ देशाने केली ‘मास्क फ्री’ची घोषणा
कोरोनामुळे गेल्या वर्षी युरोपमधील इटलीमध्ये हाहाकार माजला होता. त्यानंतर आता इटलीने कोरोनावर मात करत मास्कपासून मुक्तता मिळवली आहे. सोमवारी ही माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. व्हायरस किती वेगाने पसरत आहे, याबद्दल आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा यांनी फेसबुकवर लिहिले आहे. यासाठी इटलीमध्ये वर्गीकरण प्रणाली तयार केली गेली आहे. यानुसार व्हाईट झोनमधील लोकांना आता मास्क घालण्याची गरज भासणार नसल्याचे म्हटले आहे.
देशाच्या वर्गीकरण प्रणालीमध्ये वायव्येकडील एओस्टा व्हॅली वगळता सर्व इटालियन प्रदेश समाविष्ट आहेत. रॉबर्टो स्पेरन्झा यांनी ही घोषणा इटलीच्या कोमिटाटो टेकनिको सायंटिफो (सीटीएस) वैज्ञानिक सल्लागार पॅनेलच्या सल्ल्यानुसार केली. ज्या ठिकाणी व्हायरसचा वेगवान प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे, अशा ठिकाणी लोकांना सध्या मास्क लावणे अनिवार्य नसणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याची आवश्यकता असू शकते. जगातील अनेक देशांत असेच निर्णय घेण्यात आल्याचे यामध्ये म्हटले आहे.
इटलीतील सर्व भाग हे २८ जूनपर्यंत ‘व्हाइट’ झोन म्हणून घोषित केले जातील असे तज्ज्ञांचे मत आहे. इटलीमध्ये सोमवारी, कोरोनाचे केवळ ४९५ नवीन रुग्ण आढळून आले. तर २१ लोकांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये २०२० च्या सुरुवातीला कोरोनाचा प्रसार झाल्यापासून, देशातील मृतांची संख्या १ लाख २७ हजार २९१ झाली आहे. ४२.५ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत, १२ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना लसी दिली गेली आहे. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीमध्ये त्यांचा वाटा १.२ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे.
इटलीतील नागरिकांनी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर त्याचे पालन केले नाही. लॉकडाऊन असतानाही इटलीमधील अनेक शहरांमध्ये लोक खरेदीसाठी बाहेर पडले. हॉटेलिंग, बार आणि क्लबमध्ये रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्या, रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले बाजार असे चित्र लॉकडाउनच्या काळात इटलीमध्ये होते.
कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव इटलीमधील लॅम्बार्डी या भागामध्ये झाला आहे. येथेही लॉकडाऊनचे नियम पाळण्यात आले नाही. लॉकडाऊन राज्य सरकारनेच गांभीर्याने न घेतल्याची कबुली दिली होती. लोकांना लष्कराच्या मदतीने बळजबरीने घरात राहण्यास भाग पाडले गेले. पण त्याआधीच कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव झाला होता.