अमरनाथ यात्रा रद्द, २५ हजार कुटुंबाची रोजीरोटी बुडाली

करोना प्रकोपामुळे या वर्षीही पवित्र अमरनाथ यात्रा होऊ शकणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वर्षातून एकदा होणाऱ्या या यात्रेवर वर्षभराची कमाई करणाऱ्या सुमारे २५ हजाराहून अधिक लोकांची रोजीरोटी यामुळे बुडाली असून त्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. यात्रे दरम्यान घोडेवाले, पिटूवाले, डोलीवाले, हॉटेल, टॅक्सीचालक आणि पर्यटन व्यावसायिक यांना नुकसानीचा मोठा फटका बसणार आहे. कारण या यात्रेतून त्यांची वर्षभराची कमाई होत असते. त्यामुळे या वर्गात नाराजी पसरली आहे.

दरवर्षी या यात्रेसाठी २ ते ३ लाख नोंदणीकृत यात्रेकरू येतात. नोंदणी न केलेले भाविक सुद्धा बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. पहेलगाम आणि बालताल अशा दोन मार्गांनी ही यात्रा करता येते. यात्राकाळात दरवर्षी राजोरी, पूंछ, उधमपूर, रियासी, रामबन, काश्मीर जिल्ह्यातून १५ हजार घोडेवाले, ५ ते ६ हजार पिटूवाले, ५ हजार डोलीवाले येथे येतात. जम्मू मधून ६ हजार प्रवासी टॅक्सी येत असतात. या सर्वाना यात्रा रद्द झाल्याचा फटका बसणार आहे.

गेल्या वर्षी सुद्धा कोविड मुळे यात्रा झाली नव्हती. त्यामुळे गेले दीड वर्ष या लोकांना कमाई झालेली नाही. पर्यटन व्यवसायाला सुद्धा त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. अर्थात भाविकांना बर्फानी बाबांचे दर्शन ऑनलाईन मिळणार आहे. तसेच बालताल मार्गावर सुरक्षा रक्षक पवित्र गुहेच्या संरक्षणासाठी तैनात केले गेले आहेत असे समजते.