किम जोंग उनच्या पत्नीवर आहेत ही बंधने

प्रत्येक देशाची फर्स्ट लेडी म्हणजे राष्ट्रपती किंवा देशप्रमुखांची पत्नीला खास मानाचे स्थान मिळत असते. त्यांना काही खास अधिकार असतात. पण उ. कोरियाची फर्स्ट लेडी म्हणजे हुकुमशहा किम जोंग उन याची पत्नी री सोल जु त्याला अपवाद आहे. मुळातच उ. कोरिया मध्ये नागरिकांवर अनेक बंधने आहेत आणि तशीच काही बंधने फर्स्ट लेडीला सुद्धा पाळावी लागतात. त्यात किम जोंग उनची फर्स्ट लेडी होणे हे अजिबात सोपे नाही.

फर्स्ट लेडी री सोल स्वतःला किती मुले व्हावीत याचा निर्णय करू शकत नाही. त्यामुळे पहिल्या दोन मुली असतानाही तिच्यावर मुलगा हवा म्हणून प्रेग्नंट होण्यासाठी दबाब आणला गेला. तिला गरोदरपणात वाढलेले पोट उघड दाखविता येत नाही. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात जाता येत नाही. अगदीच जायची वेळ आली तर गरोदरपण झाकले जावे असा ढगळ पोशाख घालावा लागतो.

स्वतःच्या मर्जीने री सोल बाहेर हिंडू फिरू शकत नाही. स्वतंत्रपणे प्रवास करू शकत नाही. त्यामुळे ती जेव्हा दिसते तेव्हा किम जोंग बरोबर असतोच. तिने कुठे जायचे, कुठे नाही याचा निर्णय किम जोंग उन घेतो. री सोल विषयी काही लिहिणे, तिचे फोटो काढणे यावर बंदी आहे.

उ. कोरिया मध्ये महिलांना टाईट जीन्स, स्लीवलेस किंवा विचित्र डिझाईनचे टॉप वापरण्यास बंदी आहे. हेच नियम री सोल साठी लागू आहेत. तिचा स्कर्ट गुढघ्यापर्यंत किंवा त्याखाली येणाऱ्या लांबीचा असतो. अति उंच टाचांच्या चप्पल ती वापरू शकत नाही. तिला माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. लग्नानंतर फारच कमी वेळा तिला माहेरच्या लोकांना भेटता आलेले आहे असे सांगितले जाते.