असे आहे ‘माययोगा अॅप’

२१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुश मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी एकत्र येऊन बनविलेल्या खास माययोगा अॅपचे लॉन्चिंग करण्यात आले. काय विशेष आहे या अॅप मध्ये त्याची माहिती आमच्या वाचकांसाठी

एमयोगा किंवा माययोगा अॅप अँड्राईड आणि आयओएस अश्या दोन्ही युजर्स साठी वापरता येणार आहे आणि ते गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल अॅप स्टोरवरून डाऊनलोड करून घेता येणार आहे. हे अॅप १२ ते ६५ वयोगटातील युजर्स साठी डिझाईन केले गेले आहे. हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत ते सध्या उपलब्ध असून लवकरच युनायटेड नेशन्सच्या सर्व ६ भाषांत उपलब्ध करून दिले जात आहे.

गर्भवती महिला किंवा आरोग्यासंबंधी तक्रार असलेल्यांनी या अॅपचा वापर डॉक्टरचा सल्ला घेऊन करायचा आहे. हे अॅप पूर्ण सुरक्षित असून त्यात युजर डेटा स्टोर केला जात नाही. युजर प्रोफाईलची गरज त्याला नाही. लॉग इन करावे लागत नाही. म्हणजे अॅप इंस्टॉल केल्यावर त्याचा थेट वापर करता येतो.

आयओएस युजर साठी हे अॅप ४१.३ एमबी मध्ये येईल आणि त्याला फोर प्लस रेटिंग दिले गेले आहे. आयओएस १०.० नंतरच्या व्हर्जनवर ते वापरता येणार आहे. तसेच आयपॅड, आयपॉड टचवर सुद्धा वापरता येणार आहे. अँड्राईड युजर्स साठी ते १२ एमबी साईज मध्ये आहे. दोन्ही युजर्सना हे अॅप मोफत आहे.

१०,२० आणि ४५ मिनिटांचे योग सराव व्हिडीओ, ऑडीओ यात असून युजर त्याच्या गरजेनुसार त्यातून निवड करू शकणार आहे. व्हिडीओ डाऊनलोड करून ऑफलाईन सुद्धा त्याचा वापर करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाची ही डिजिटल भेट आहे असे त्याविषयी म्हटले गेले आहे.