टोकियो ऑलिम्पिक : खेळाडूंना त्यांच्या खोल्यांमध्ये करता येणार मद्यपान


नवी दिल्ली – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर टोकियो येथे यावर्षी २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. खेळाडूंसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे स्पर्धेच्या आयोजन समितीने जारी केली आहेत. या तत्त्वांनुसार, खेळगावात खेळाडू काय करू शकतात आणि काय नाही, हे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेसह अनुमती मिळाली आहे.

यासह, १६ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीचा निर्णय घेण्यात येईल. ऑलिम्पिक समितीने यावेळी स्टेडियममध्ये जास्तीत जास्त १०,००० प्रेक्षकांना परवानगी देण्याचे स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती नाही अशा क्षेत्रांना ही परवानगी देण्यात आली आहे. तसेच ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान २० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खेळाडूंना ऑलिम्पिक समितीनेही नव्या नियमांनुसार कंडोम वाटण्यास नकार दिला आहे. पण, जपानची वृत्तसंस्था क्योडोनुसार, खेळाडूंना मायदेशी परतताना हे कंडोम मिळणार आहेत. तथापि, खेळाडूंना त्यांच्या खोल्यांमध्ये मद्यपान करण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे सर्व नियम खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी अवलंबत असल्याचे ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले आहे.

१९८८पासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. ही प्रथा एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आली. ४,५०,००० कंडोमचे वाटप रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने केले होते.