लखनौ – राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी तिघांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार विनीत नारायण आणि अन्य दोघांचा यामध्ये समावेश आहे. जमीन हडपल्याच्या प्रकरणात चंपत राय यांचा सहभाग असल्याचा आरोप नारायण यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.
राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिवांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
हा गुन्हा अयोध्येत वादग्रस्त जमीन व्यवहारावरून प्रश्नांना सामोरे जात असलेले चंपत राय यांच्या भावाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. राय आणि त्यांच्या भावांना बिजनौर पोलीस प्रमुखांनी ‘क्लीन चिट’ दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये नारायण यांनी अल्का लाहोटी यांच्या गोशालेचा तपशील असलेला अर्जही जोडला होता, त्याबद्दल पोलिसांनी नोंद केली आहे. तसेच चंपत राय यांचा भाऊ बंधू सुनील कुमार बन्सल यांच्या म्हणण्यानुसार आपला भाऊ चंपत राय आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची विनाकारण बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तसेच आमचा आणि भाऊ चंपत राय यांचा गोशाला आणि महाविद्यालयाशी काही संबध नाही. राजकारण आणि निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
पोलीस अधिक्षक, डॉ. धरमवीर सिंग यांच्या माहितीनुसार, तिघांविरोधात नगीना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवरील चंपत राय यांच्याविरूद्ध टिप्पणी पूर्णपणे निराधार आहेत. त्याच्यावरील आरोप असत्य आहेत. यासह आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बिजनौरच्या नगीनामधील सरायमरमध्ये चंपत राय यांचे वडिलोपार्जित घर आहे. १९८० मध्ये चंपत राय यांनी बिजनौर सोडले. चंपत राय यांना सहा भाऊ आहेत, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. विनीत नारायण नावाच्या व्यक्तीने अलीकडेच फेसबुकवर चंपत राय यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले होते. हे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चंपत राय यांचे भाऊ संजय बन्सल यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत तिघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर विनीत नारायण, अलका लाहौटी आणि रजनीश यांच्याविरूद्ध बिजनौरच्या नगीना पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.