म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या – अजित पवार


बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, तसेच पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणे आवश्यक आहे. कोरोना पश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत.

ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जादा आहेत त्या ठिकाणी हॉट स्पॉट घोषित करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी सहा मिनिटे चालायची सोपी टेस्ट करुन घ्या, जर ऑक्सिजन कमी झाल्याचे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेऊन पेशंटला ॲडमिट करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोणत्या वयातील व्यक्ती दगावल्या व त्यापैकी किती व्यक्तींना दुसरे आजार होते याबाबतचा चार्ट वैद्यकीय अधिकारी यांनी तयार करावा असे आदेश ही त्यांनी दिले.

पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात,

पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे., सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे. संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. लसीकरणाचे नियोजन योग्य प्रकारे करावे म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

नगरसेवक जय पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या ‘हरित बारामती, हरित तांदुळवाडी’ उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते तांदुळवाडी येथे वृक्षारोपण करुन करण्यात आला. यावेळी नागपरिषदचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच बारामती दूध संघाच्या वतीने कोरोनाने निधन झालेले कर्मचारी भगवान रामचंद्र दडस व शंकर दगडू खांडेकर यांच्या कुटुंबातील सदस्याना मदत म्हणून प्रत्येकी 5 लाखाचे धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सुपूर्द केले.

तसेच मॅगनम इंटरप्रायजेस, बारामती यांच्याकडून मास्क आणि ॲन्टीजन किट देण्यात आले त्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वैद्यकीय विभागास सुपूर्द करण्यात आले. यावेळी मॅगनम इंटरप्रायजेसचे संतोष भोसले आणि प्रशासकीय अधिकरी उपस्थित होते.