शिवसेना-भाजप युतीवर गिरीश बापट यांचे मोठे वक्तव्य


पुणे – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून राज्यात वारंवार स्वबळाचा नारा दिला जात असतानाच शिवसेनेमधूनच आता भाजपसोबत पुन्हा युती करण्याची मागणी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिलेल्या पत्रामुळे आता पुन्हा राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याबाबतचे पत्र सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यावर आता भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप युती होऊ शकते, असे वक्तव्य केले आहे.

गिरीश बापट यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर आपली भूमिका मांडली आहे. भाजपकडून सरनाईक यांना त्रास दिला जात नाही आहे. यंत्रणा त्यांच्या कामाचा पाठपुरावा करत आहेत. भारतीय जनता पार्टी कोणालाही त्रास न देणारी गरीब पार्टी आहे. ती लोकांना मदत करत असते, असे गिरीश बापट म्हणाले.

प्रताप सरनाईक यांची बोलकी प्रतिक्रिया असून जे पत्र प्रताप सरनाईक यांनी लिहिले आहे. शिवसेना-भाजप युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होऊ शकते. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते. नंतर आमची युती अनैसर्गिक लोकांमुळे तुटली होती. त्यामुळे भविष्यात युती होऊ शकते. जर युती झाली, तर आम्हाला त्याचा आनंद होईल. आत्ता जे प्रताप सरनाईक बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होत असतांना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय शिवसेनेला घ्यायचा असल्याचे म्हणत बापट यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे.

शनिवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बापट यांनी टीका केली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचे प्राधान्य राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी हा एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही. शरद पवारांचे अजितदादा हे ऐकत नाही हे माहिती होते, पण आता कार्यकर्ते देखील ऐकत नाही हे माहिती झाल्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक असल्याचा टोलाही बापट यांनी लगावला.