योग दिनाच्या कार्यक्रमाला गेलेल्या बबीता फोगटला शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे


हरयाणा – भाजप आणि जजपाच्या (जननायक जनता पार्टी) नेत्यांचा हरयाणामध्ये कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन विरोध केला जात आहे. पंजाब आणि हरयाणामध्ये अद्यापही मागील अनेक महिन्यांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची धग कायम आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज येथील चरखी दादरीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पोहचलेल्या भाजप नेत्या आणि महिला विकास मंडळाच्या प्रमुख बबीता फोगट यांचा स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. फोगट यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वीच योग दिनानिमित्त भाजप आणि जजपाच्या नेत्यांना गावात शिरु दिले जाणार नसल्याची भूमिका घेतली होती.

राज्य सरकारने चरखी दादरीमधील आंदोलनाची शक्यता लक्षात घेत कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पण शेतकरी कार्यक्रमामध्ये काळे झेंडे घेऊन पोहचले आणि मंचाच्या दिशेने चालू लागले, तेव्हा पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. खाप प्रमुख बलवंत नंबरदार यांच्या नेतृत्वाखाली बबीता फोगटविरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. कृषी कायदे जोपर्यंत रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत फोगट यांचा आम्ही अशाच पद्धतीने विरोध करत राहू, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

न्यूज १८ शी बोलताना खाप प्रमुख बलवंत नंबरदार यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि जजपाच्या नेत्यांनी कोणत्याही कार्यक्रमासाठी गावांमध्ये येऊ नये, असा इशारा आम्ही दिला होता. गावात प्रवेश करण्याचा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असे आधीच सांगण्यात आले होते. सरकार सतत षडयंत्र रचून शेतकरी आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बलवंत नंबरदार यांनी केला.

पण आपल्या शेतकऱ्यांचा दृढ निश्चय असून मागण्या पूर्ण झाल्यानंतरच ते घरी परतणार असल्याचा विश्वास बलवंत नंबरदार यांनी व्यक्त केला. यासंदर्भात सरकारने वेळीच जागृक व्हावे. सरकारसोबत चर्चा करण्यास शेतकरी तयार आहेत. सरकारने यासाठी कोणत्याही अटीशिवाय शेतकऱ्यांना चर्चेला बोलवले पाहिजे. शेतकरी आणि सरकार असे दोन्ही बाजूने शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पाहिजेत, असे मत बलवंत नंबरदार यांनी व्यक्त केले.