छत्तीसगड पोलीस घेत आहेत चोरीला गेलेल्या ८०० किलो शेणाचा शोध


छत्तीसगड – शेण चोरी होण्याची विचित्र घटना छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात घडली आहे. कोरबामधील एका गावातून ८०० किलो शेण चोरून नेल्याची तक्रार छत्तीसगड पोलिसांना मिळाली. कोरबा जिल्ह्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरांचा शोध सुरू केला आहे.

८ ते ९ जून रोजी मध्यरात्री दिपका पोलीस स्टेशन परिसरातील धुरेना गावात ८०० किलो शेण चोरीला गेले. त्याची किंमत सुमारे १६०० रुपये आहे. १५ जून रोजी ही औपचारिक तक्रार गोधन ग्रामिण समितीचे अध्यक्ष कमहनसिंग कंवर यांनी दाखल केल्याची माहिती दिपका पोलीस स्टेशन परिसर प्रभारी हरीश तांडेकर यांनी दिली.

कमहनसिंग कंवर म्हणाले, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पीडितेचे निवेदनही पोलिसांनी घेतले आहे आणि घटनेबाबत आसपासच्या ग्रामस्थांचीही चौकशी केली आहे. छत्तीसगड सरकारने ‘गोधन न्याय योजना’ गांडूळ कंपोस्ट उत्पादनासाठी सुरू केली. त्याअंतर्गत शेण २ रुपये किलोच्या आधारे विकत घेतले जाते. २० जुलै रोजी हरेली उत्सवाच्या निमित्ताने ही योजना सरकारने सुरू केली होती. यामध्ये सुरुवातीला पशुपालकांकडून दीड रुपये प्रतिकिलो दराने शेण खरेदी करण्याची योजना होती.