रिलायंस होम फायनान्ससाठी या कंपनीची सर्वाधिक बोली

अंबानी परिवारातील कर्जबाजारी बनलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायंस होम फायनान्स कंपनीच्या खरेदीसाठी मुंबईतील फारश्या प्रसिध्द नसलेल्या आथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने २९०० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली असल्याचे समजते. अन्य तीन कंपन्या रिलायंस होम खरेदीसाठी प्रयत्न करत आहेत मात्र आथमने त्यासाठी सर्वात मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखविली आहे.

या कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया विक्री होत असून रिलायंस होम फायनान्स रिलायंस कॅपिटलचे युनिट आहे. आथमने लावलेली बोली अंतिम ठरली तर आथमच्या या प्रस्तावाला बँक ऑफ बरोडाच्या नेतृत्वाखाली कंपनीला कर्ज देणाऱ्या ऋणदात्यांना २५८७ कोटींची रक्कम सुरवातीला मिळेल आणि उर्वरित ३०० कोटी १ वर्षाच्या आत दिले जातील असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऋणदात्यांनी आथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रस्तावाला मतदानात स्वीकार दर्शविला आहे. ३१ मे ते १९ जून या काळात मतदान प्रक्रिया सुरु होती. हा सौदा झाला तर रिलायंस कॅपिटलवरील कर्जाचे ओझे ११२०० कोटींनी कमी होणार आहे. रिलायंस ग्रुप मधील अनेक कंपन्या कर्ज भागविण्यात अयशस्वी ठरल्याने न्यायालयाने कंपनीची दिवाळखोरी जाहीर केली होती. अनिल अंबानी यांच्यावर फेब्रुवारी २०२० अखेर ३०.५ कोटी डॉलर्सचे कर्ज असून असेट फक्त ८.२ कोटी डॉलर्सचे आहेत असेही सांगितले जात आहे.