योगाभ्यास,सीमेवरील सैनिकांचा

भारतासह आज जगाच्या अनेक देशात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. करोना लाटेचा परिणाम या कार्यक्रमावर फारसा झालेला नाही. कारण अनेक ठिकाणी मोजक्या संखेने एकत्र येऊन २१ जून रोजी साजरा होणारा हा दिवस साजरा केला आहे. भारताच्या सीमेवर तैनात भारत तिबेट सीमा पोलीस दलाने म्हणजे आयटीबीटीने सुद्धा लडाख मध्ये १८ हजार फुट उंचीवर योग दिवस साजरा केला. यावेळी कडाक्याच्या थंडीत आणि चहुबाजूने बर्फाने झाकल्या गेलेल्या जागेवर सैनिकांनी योगासने केली.

अत्यंत दुर्गम भागात अरुणाचल प्रदेशात लोहितपूर येथील पशु प्रशिक्षण स्कूल मध्ये आयटीबीपी जवानांनी घोड्यासह योगासनात भाग घेतला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी योग फार महत्वाचा असल्याचा संदेश यातून दिला गेला.

लडाख मधील प्रसिध्द पेंगोंग लेक किनाऱ्यावर सुद्धा सैनिकांनी योग दिवस साजरा केला. सहा वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्राला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे विशेष म्हणजे वर्षाच्या ३६५ दिवसात २१ जून हा सर्वधिक मोठा दिवस असून योगाच्या निरंतर अभ्यासामुळे व्यक्ती दीर्घायुषी होऊ शकते असे यातून सूचित केले गेले आहे.

यंदाच्या योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ अशी आहे. पंतप्रधान मोदी यांनी करोना काळात योग  लोकांसाठी आशेचा किरण बनला असे म्हटले आहे.